वार्षिक स्नेहसंमेलन २०१९

फिनोलेक्स अॅकॅडमीमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन २०१९ चा उद्घाटन सोहळा आणि फाऊंडर्स डे संपन्न

बदल हा जीवनाचा अविभाज्य घटक, त्यासाठी तयार रहा  – कु.  कृती जैन

प्रतिवर्षीप्रमाणे फिनोलेक्स अॅकॅडमी ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नोलॉजी, रत्नागिरी येथे वार्षिक स्नेहसंमेलन २०१९ चा उद्घाटन सोहळा आणि संस्थापक पी. पी. छाब्रिया यांच्या स्मृतीप्रित्यर्थ फाऊंडर्स डे दिनांक १७ फेब्रुवारी २०१९ रोजी संपन्न झाला.

सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून कुमार बिल्डर्सच्या मुख्य कार्यकारी अधिकारी कु.  कृती जैन आणि विशेष अतिथी म्हणून मॅप्रो फूड प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक श्री.  मयूर व्होरा  उपस्थित होते. श्रीमती अरुणा कटरा, अध्यक्ष, होप  फाऊंडेशन यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषवले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. अॅलन फर्नांडिस  व कु. वसिका टमके यांनी केले. प्राचार्य डॉ. कौशल प्रसाद यांनी मान्यवरांचे स्वागत व परिचय करून दिला. विदयार्थी प्रतिनिधींनी कॉलेजमधील विविध स्तरावरील घटनांचा मागोवा घेतला व विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांबद्दल माहिती दिली.

कार्यक्रमाचे विशेष अतिथी  श्री.  मयूर व्होरा यांनी आपल्या भाषणात सहज सोप्या  भाषेत मातृभाषेचे महत्व विशद केले.  प्रत्येक व्यक्तीने यशस्वी होताना आरोग्य , सामाजिक बांधिलकी, विदेशी भाषा ज्ञान व आनंद यांना महत्व देणे आवश्यक आहे. शिक्षण म्हणजे समजून घेणे, संबंध बांधणे  व संवाद साधणे  यांचा मिलाफ होय असे नमूद केले.

कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या  कु. कृती जैन यांनी विदयार्थ्यांना मार्गदर्शन करताना, पारंपारिक पद्धतीने करण्यात येणारे व्यवसाय भविष्यात इतिहास जमा होणार आहेत याची जाणीव करून देत आज घेत असलेले शिक्षण भविष्यात पुरेसे नसून वेळोवेळी नवनवीन ज्ञान आत्मसात करावे लागेल असे नमूद केले. जगामध्ये सतत होत जाण्याऱ्या बदलांसाठी स्वतःमध्ये बदल घडवून आणणे हे अत्यंत  आवश्यक आहे.  जगामध्ये नवनवीन शोध लावले जात आहेत. लहान वयातील मुले देखील नवनवीन तंत्रज्ञान विकसित करत आहेत. यासाठी लागणारी साधनसामुग्री, माहिती, तंत्रज्ञान, डिझाईन इत्यादी इंटरनेटच्या माध्यमातून सहज उपलब्ध होत असून याचे ज्ञान घेऊन  विदयार्थ्यांनी वेळोवेळी अद्ययावत राहणे गरजेचे आहे असे स्पष्ट केले.

तर कार्यक्रमाच्या अध्यक्ष श्रीमती अरुणा कटारा यांनी संस्थापक अध्यक्ष श्री . प्रल्हाद पी छाब्रिया यांच्या प्रेरणादायी व्यक्तिमत्वाची आठवण करून देत सकारात्मकवृत्ती आणि विश्वासाच्या बळावर आपण आपल्या आयुष्यात हवे ते साध्य करू शकतो. मी सर्वोत्तम आहे,  मी सर्वोत्तम करू शकतो, मी  करीन ते सर्वोत्तमच असेल हि वृत्ती, हा विश्वास माणसाला सर्वोत्तम  बनवतो हे नमूद केले.

यावेळी अॅकॅडमीमधील गुणवंत विदयार्थ्यांना चेअरमन प्राईज व स्व.  श्रीमती मोहिनी छाब्रिया अवॉर्ड प्रत्येकी रुपये दहा हजारची रोख पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले तसेच गुणवंत गरजू विदयार्थ्यांना होप फाउंडेशन शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली.

प्रथम वर्ष इंजिनीअरिंगमध्ये सर्वप्रथम येण्यासाठी व एकाच प्रयत्नात परीक्षा पास होण्यासाठी असलेले चेअरमन प्राईज कु. नचिकेत ज्ञानेश जोशी याने पटकाविले.

इंजिनीअरिंग अभ्यासक्रमात अॅकॅडमीमध्ये प्रत्येक शाखेतून प्रथम येण्यासाठी दिला जाणारा स्व . श्रीमती मोहिनी छाब्रिया अवॉर्ड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग  शाखेतून कु. अर्डे वैभव कृष्णा, इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग शाखेतून कु.नदाफ  सलमान लालसाब, मेकॅनिकल इंजिनीअरिंग शाखेतून कु. होडेकर रझिन हनीफ, इन्फॉर्मेशन  टेक्नोलॉजी शाखेतून कु. मुकादम अरुसा इरफान, केमिकल इंजिनीअरिंग शाखेतून कु. मुसळे आकाश विष्णू,  इलेक्ट्रॉनिक्स अॅन्ड टेलीकम्युनिकेशन इंजिनीअरिंग शाखेतून कु. आंबेलकर रुही रमाकांत  व मास्टर ऑफ कॉम्प्युटर अँप्लिकेशन शाखेतून कु. खांचे गौसिया अल्लाउद्दीन याना प्रदान करण्यात आला. तसेच कु. बागडे स्वरूपा विष्णू, कु. गोसावी राजकुमार वसंत, कु. कोंडविलकर प्रथमेश प्रकाश, कु. राणे साईनाथ गुरुनाथ, कु. सिंग रितेश या विदयार्थ्यांना होप फाऊंडेशन  शिष्यवृत्ती देऊन गौरवण्यात आले.

त्याचबरोबर श्रीमती  अरुणा कटारा, अध्यक्ष, होप फाऊंडेशन यांच्यावतीने खेळातील विशेष प्रावीण्याबद्दल मुली व मुलांमधून सर्वोत्तम क्रीडापटू  पारितोषिक दिले जाते. २०१८-१९ वर्षातील सर्वोत्तम क्रीडापटू  म्हणून कु. मांजरेकर शैलेश रवींद्र व कु. जाधव उषा मच्छिन्द्र यांना गौरविण्यात आले.  सर्वोत्तम विद्यार्थांचे पारितोषिक कु. डाळे ऋषिकेश गोविंद याने पटकाविले.

यावेळी फिनोलेक्स अॅकॅडमीच्या विदयार्थ्यांनी संस्थेमध्ये स्वतः तयार केलेली इलेक्ट्रिक ( सौरऊर्जा )कारची सर्व मान्यवरांनी पाहणी करून कौतुक केले. ब्रेनव्हेज अंतर्गत कलाकृती या कला दालनात विदयार्थ्यांनी अतिशय कुशलतेने घडवलेल्या पॉट पेटिंग, रांगोळी, चित्रकृती, फोटो गॅलरी तसेच नेचर क्लब मार्फत भरवण्यात आलेल्या प्रदर्शनाबद्दल मान्यवरांनी समाधान व्यक्त केले.

डॉ मिलिंद यादव यांनी मेकॅनिकल इंजिनीअरिंग शाखेतून पीएचडी केल्याबद्दल त्यांना गौरविण्यात आले.  तसेच संस्थेमधील विशेष सेवेबद्दल श्री. दीपक मेस्त्री, श्री. राजेंद्र उत्तेकर, श्री. राजेश भोसले व श्री. अविनाश लिंगायत यांना गौरविण्यात आले.

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ संजय कुलकर्णी यांनी केले. यावेळी अॅकॅडमीचे विदयार्थी, शिक्षक वृंद, पालक, परिसरातील मान्यवर व इतर श्रोतृवर्ग मोठया संख्येने उपस्थित होता. दिनांक १७, १८ व १९ फेब्रुवारी २०१९ असे तीन दिवस सदर वार्षिक संमेलनाचा सर्व विदयार्थी, पालकवर्ग व आमंत्रितांनी आस्वाद घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे .

Loading